केरळच्या धर्तीवर लॉटरी मधून महाराष्ट्राचे उत्पन्न वाढवता येईल: सुधीर मुनगंटीवार यांनी वेधले लक्ष; अभ्यासासा… – Divya Marathi

आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
केरळच्या धर्तीवर महाराष्ट्राला देखील लॉटरीच्या माध्यमातून उत्पन्न वाढविता येऊ शकते, यासंदर्भात राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत लक्ष वेधले.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी फर्निचर क्लस्टरसाठी 75 कोटी रुपयांचा निधी आवश्यक असल्याचा मुद्दा सभागृहात अनुदानावरील चर्चेदरम्यान मांडला होता. त्यावर निधीबाबत असमर्थता दर्शवण्यात आली. त्यामुळे आ. मुनगंटीवार यांनी सरकारला महाराष्ट्राचे उत्पन्न कसे वाढवता येईल, याबाबत सूचना केल्या. उत्पन्न वाढवल्यास विकास साधणारी, रोजगार देणारी कामं थांबविण्याची गरज पडणार नाही, असे आ. मुनगंटीवार म्हणाले. त्याचवेळी त्यांनी केरळच्या धर्तीवर लॉटरीतून उत्पन्न वाढवण्याची सूचना केली. ही सूचना अर्थमंत्री अजित पवार यांनी सकारात्मकपणे घेतली आणि त्या कमिटीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांना करणार असल्याची घोषणा केली.
लॉटरीच्या माध्यमातून केरळचे 2023-24 चे उत्पन्न 12 हजार 529 कोटी आहे. केरळ पॅटर्न राबवल्याने राज्यातील उत्पन्न वाढत असेल तर नक्कीच त्या दृष्टीने विचार करायला हवा. यासाठी आमदारांची एक समिती करावी, ती केरळला पाठवावी. ही समिती केरळ लॉटरीचा अभ्यास करेल आणि त्याचा अहवाल देईल, अशी सूचनाही आ. मुनगंटीवार यांनी केली. त्यानंतर अजित पवार यांनी या संदर्भात लवकरात लवकर समिती स्थापन करण्यात येईल आणि या समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार असतील, अशी घोषणा सभागृहात केली.
12 एप्रिल 1969 ला महाराष्ट्र राज्य लॉटरी सुरू झाली. साप्ताहिक, मासिक पद्धतीने गुढीपाडवा, गणपती यावेळी लॉटरी काढली जाते. राज्याचे सन 2023-24 चे एकूण उत्पन्न 24 कोटी 43 लाख 61 हजार आहे. बक्षीस, जीएसटी सर्व जाऊन 3 कोटी 51 लाख 66 हजार 163 रुपये राहतात. त्यामुळे या विभागाने अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. मी स्वतः जीएसटीच्या 35 बैठकांमध्ये सदस्य होतो. त्यामुळे इतर राज्यांमधील चांगली धोरणे आपण स्वीकारायला हवीत, असेही आ. मुनगंटीवार म्हणाले.
2 हजार 72 कोटी रेव्हेन्यू सर प्लस बजेट दिले
गरीब आणि मध्यमवर्गीय लोक मोठ्या प्रमाणात लॉटरी खरेदी करतात. त्यामुळे लॉटरीतून मिळालेला पैसा गरिबांच्या उत्थानासाठी खर्च करता येईल, असा विचार केरळ सरकारने केला. त्यानुसार त्यांनी अंमलबजावणीही केली, त्यामुळे आपणही यादृष्टीने अभ्यास करण्याची गरज आहे, असे आ. मुनगंटीवार म्हणाले. मी अर्थमंत्री असताना देशात 11 हजार 975 कोटी रेव्हेन्यू सरप्लस बजेट मी दिले. 2 हजार 72 कोटी रेव्हेन्यू सर प्लस बजेट दिले. त्यामुळे हे शक्य आहे, हे मला माहिती आहे. राज्याचे उत्पन्न वाढवण्याचे नवनवीन मार्ग शोधावे लागतील, असेही आ. मुनगंटीवार सभागृहात म्हणाले.
Copyright © 2024-25 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.

source

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *