देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत घर खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. म्हाडा (MHADA) यंदाही दिवाळीपूर्वी मोठी लॉटरी काढणार आहे. मुंबईत म्हाडाकडून सुमारे ५ हजार घरांची लॉटरी काढली जाणार असल्याची माहिती म्हाडाचे सीईओ आणि उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यासोबतच बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील काही घरांची चावी मे महिन्यातच लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
संजीव जयस्वाल यांनी म्हाडा व सिडकोसह इतर गृहनिर्माण मंडळांच्या कामकाजाबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितले की, त्यांच्या रुजू होण्याच्या काळात सुमारे १९ हजार घरं रिकामी होती. आज त्या घरांपैकी ७ ते ७.५ हजार घरं विकली गेली असून सध्या १२,५०० घरं पडून आहेत. उर्वरित घरं विक्रीसाठी विविध योजना, सवलती व भाडेगृह (Rental Housing) योजनेच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या एक ते दीड वर्षात ९० टक्के घरं विकली जातील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (MHADA) २०२५-२६ या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पात राज्यभरात १९,४९७ नव्या घरांचे बांधकाम करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी तब्बल ९२०२.७६ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे यातील ५१९९ घरं मुंबईत उभारण्यात येणार असून, यासाठी एकट्या मुंबई मंडळासाठी ५७४९.४९ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसेच, कोकण मंडळांतर्गत ९९०२ घरं बांधली जाणार असून त्यासाठी १४०८.८५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. नाशिक, अमरावती, छत्रपती संभाजीनगर व नागपूर मंडळातही घरांच्या नव्या प्रकल्पांवर भर दिला जाणार आहे. म्हाडाच्या २०२४-२५ च्या सुधारित आणि २०२५-२६ च्या नव्या अर्थसंकल्पाला नुकतीच अधिकृत मंजुरी मिळाली आहे.
दिवाळीपूर्वी येणाऱ्या या लॉटरीमुळे मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील घरांच्या चाव्यांचे वाटप मे महिन्यात होणार असल्याने अनेक वर्षे वाट पाहणाऱ्या रहिवाशांचा मोठा प्रश्न सुटणार आहे.
संतोष बांगर पुन्हा वादाच्या केंद्रस्थानी; अतिरेक्यांवर थेट गोळीबाराची मागणी
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; म्हाडाकडून दिवाळीपूर्वी ५ हजार घरांची लॉटरी – Time Maharashtra
