चंद्रपूर: केरळची यशस्वी लॉटरी योजना महाराष्ट्राच्या अर्थकारणाला नवी दिशा देणारी ठरेल, असा विश्वास राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.
राज्याचे माजी अर्थमंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी तिरुअनंतपुरम येथे केरळच्या लॉटरी मॉडेलचा सखोल अभ्यास करण्याच्या दृष्टीने भेट दिली. यावेळी केरळचे अतिरिक्त मुख्य सचिव के. आर. ज्योतिलाल यांच्यासोबत त्यांची महसूलवाढीच्या संधींबाबत व्यापक चर्चा झाली. केरळच्या सचिवालयात पार पडलेल्या या बैठकीला आमदार रोहित पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी केरळ लॉटरीच्या उपसंचालक स्टेफिना रॉड्रिग्ज यांनी मुनगंटीवार यांचे स्वागत केले.
आमदार सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, ही योजना केवळ महसूलवाढीपुरती मर्यादित नाही, तर रोजगार निर्मिती आणि सामाजिक कल्याणाचा प्रभावी स्त्रोत ठरेल. या चर्चेदरम्यान, लॉटरी योजनेतील पारदर्शकता, सामाजिक विश्वास आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग, यावर विशेष भर देण्यात आला. केरळ मॉडेलमध्ये राज्यातील जनतेचा लॉटरी व्यवस्थेवर प्रचंड विश्वास आहे आणि हीच गोष्ट त्याच्या सातत्यपूर्ण यशामागील खरी ताकद असल्याचे त्यांनी नमूद केले.
या बैठकीदरम्यान केवळ लॉटरीच नव्हे तर केरळचे एकूण आर्थिक आरोग्य, मसाल्यांच्या व्यापाराचे महत्त्व आणि राज्याच्या ऐतिहासिक परंपरेचा आर्थिक विकासाशी असलेला संबंध या मुद्द्यांवरही चर्चा करण्यात आली. राज्याच्या महसूलवाढीसंदर्भात आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात विधानसभेत चर्चा घडवून आणली होती. यावेळी केरळ व इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्राला लॉटरीच्या माध्यमातून महसुलात भर घालता येईल, अशी सूचना आमदार मुनगंटीवार यांनी केली होती.
मुनगंटीवार यांच्या सकारात्मक सूचना लक्षात घेता राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आमदार मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली केरळ राज्यातील लॉटरीचा अभ्यास करण्यासाठी समिती गठित केली. या समितीचे अध्यक्ष आमदार सुधीर मुनगंटीवार व सदस्य सध्या केरळ राज्याच्या दौऱ्यावर असून लॉटरीचा अभ्यास करीत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूज येथील जाहीर सभेत पाकिस्तानला इशारा दिला की, “तुम्ही सुखाचे आयुष्य जगा, भाकर खा नाहीतर माझी गोळी आहेच.” त्यांनी पाकिस्तानातील दहशतवाद संपविण्यासाठी तेथील नागरिकांना पुढे येण्याचे आवाहन केले.
“केरळ लॉटरी महाराष्ट्राच्या अर्थकारणाला नवी दिशा देणार,” माजी अर्थमंत्र्यांचा विश्वास… – Loksatta
